मुंबई -देशातील भाजपशासित राज्यांमध्ये दलित आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज काँग्रेसने दादर येथील चैत्यभूमी परिसरात भाजप आणि केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारत जोरदार आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे अर्धा डझनहून अधिक मंत्री या आंदोलनात सहभागी झाले होते.
चैत्यभूमीवरील आंदोलनात काँग्रेसचे अर्धा डझनहून अधिक मंत्री उपस्थित; केंद्र सरकार आणि भाजपविरोधात एल्गार - भाजपविरोधात काँग्रेसचे आंदोलन
देशातील भाजपशासित राज्यांमध्ये दलित आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज काँग्रेसने दादर येथील चैत्यभूमी परिसरात भाजप आणि केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारत जोरदार आंदोलन केले.
यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री विश्वजीत कदम, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह काँग्रेसचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर आदी नेते या आंदोलनात सहभागी झाले होते.
भाजपशासित राज्यांमध्ये दलितांनी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप विरोधात जोरदार भाषणबाजी केली. भाजपकडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे आणि अत्याचार करणाऱ्या महिलांना न्याय मिळू दिला जात नाही. उलट त्यांच्या त्यांच्यावर दबाव तंत्र वापरले जात आहे. यामुळे भाजपशासित राज्यांमध्ये दलित आणि महिला असुरक्षित असून, त्यांच्या सुरक्षेसाठी काँग्रेसने हा देशभरात एल्गार पुकारला असल्याचे सूतोवाच काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले.