मुंबई- राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून यामध्ये दुर्दैवाने 76 जणांचा बळी गेला आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळईमध्ये 32 घरांवरती दरड कोसळल्याने तब्बल 47 जणांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तर 41 जण अद्याप बेपत्ता आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज(शनिवारी) महाडच्या पूरग्रस्त आणि दरडग्रस्त घटनास्थळाचा पाहणी दौरा करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. या दौऱ्यात ते तळई येथील दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत. राज्यातील पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ,एसडीआरएफ, लष्कर आणि नौदलासह वायूदलाच्या तुकड्याही याकार्यात सहभागी झाल्या आहेत.
अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास महाड येथील वरंध घाट परिसरातील तळई गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दुर्घटनेत 47 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ मार्फत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दुपारी १२ वाजता, मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावाकडे निघणार आहेत. दुपारी 1.30 वाजता तळई येथे पोहोचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करुन दुपारी 3.20 वाजता हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालय विभागाकडून देण्यात आली