मुंबई - मागील तीन दिवसापासून पुढे ढकलण्यात आलेल्या मंत्रिमंडळाची बैठक आज (गुरुवारी) दुपारी होणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या संदर्भातील मुख्य प्रस्ताव मुंजरीसह मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यामुळे राज्यभरात रखडलेल्या अकरावी, आयटीआय, अभियांत्रिकी आदी अनेक प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा प्रश्नही निकाली लावणार जाणार आहे. तसेच विद्यापीठ कायद्यामध्ये काही सुधारणा करण्याचा विषयही आजच्या बैठकीत येणार असल्याचे सांगण्यात येते.
मराठा आरक्षण आणि शैक्षणिक प्रवेश
मागील दीड महिन्यापासून राज्यातील अकरावी, अभियांत्रिकी, आयटीआय आदी व्यवसायिक आणि पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे रखडलीे आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या स्थगिती वरील सुनावणी पुन्हा चार आठवडे पुढे ढकलली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक प्रवेशाच्या संदर्भात नवीन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ कायद्यातील तरतुदी बदलण्यासाठी हालचाली-
राज्यभरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर नुकसानग्रस्त भागासाठी सरकारकडून नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या मदतीवर ही मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाणार आहे. मागील सरकारने मंजूर केलेला विद्यापीठ कायदा आणि त्यातील अनेक त्रुटींमुळे विद्यापीठाच्या कामगारावर मोठा परिणाम झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन या कायद्यात अनेक प्रकारच्या सुधारणा करण्याच्या हालचाली मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळात या सुधारणा करण्याच्या विषयावर नवीन अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता अधिकारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
राज्यपाल नियुक्त सदस्य, प्रवेशाचे विषय अजेंड्यावर-
मागील पाच महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्न महा विकास आघाडी सरकारला मार्गी लावता आला नाही. मात्र सरकारने हा विषय सोडवण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. एकूण असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 जागांवर महा विकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना या तिन्ही पक्षांना समान अशा प्रत्येकी चार-चार सदस्यांची नावे राज्यपालांना कळवली जाणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणून ही नावे कळविण्याची सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला जाणार आहे.
काँग्रेसकडून नावाचा गोंधळ सुरूच-
काँग्रेसकडून नावा संदर्भात अद्यापही गोंधळ असल्याने त्यांच्याकडून येत्या काही दिवसात नावे अंतिम केली जाणार आहेत.त्यानंतर महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची बारा नावे राज्यपालांना कळवली जाणार आहेत. यामुळे आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावासाठी महत्त्वाची ठरणार आहे.