मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप या बाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु आज विस्तार तर बुधवारपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon session ) घेण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून होणारी टीका टाळत शिंदे सरकार ( Shinde Govt ) अॅक्शन मोडवर आल्याचे समोर येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कसोटी लागताना पाहायला मिळत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ 18 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून 9, तर एकनाथ शिंदे गटातील 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.
काही आमदार नाराज असल्याची चर्चा -मात्र पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात ज्या आमदारांची वर्णी लागली नाही, असे आमदार नाराज झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रताप सरनाईक यांची वर्णी लागणार नाही. त्यामुळे हे दोन्ही आमदार नाराज असल्याच म्हंटल जातं आहे. यासोबतच अजूनही काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. आमदारांमध्ये नाराजी राहू नये. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने प्रयत्न करत आहेत.
नांदेड आणि हिंगोली दौऱ्या आटोपल्यानंतर मध्यरात्री एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी घेतली. मात्र तेव्हाही आमदारांमध्ये नाराजी दूर झाली नाही. त्यामुळे आज सकाळी पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहात आमदारांची बैठक सुरू आहे. मात्र अद्यापही काही आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे.