मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या विधानाचे पडसाद आता आरोग्य क्षेत्रात उमटू लागले आहेत. काल इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने या वक्तव्याचा निषेध नोंदवल्यानंतर आता निवासी डॉक्टरांची मार्ड संघटनाही आक्रमक झाली आहे. मार्डनेही हे विधान राऊत यांनी त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशाराही मार्डने एका पत्राद्वारे दिला आहे.
महत्वाचे म्हणजे मार्डने या प्रश्नी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत आपल्या पक्षाचे खासदार जी भूमिका मांडत आहे, तीच आपली भूमिका आहे का? असा सवालही केला आहे. तसे नसेल तर हे वक्तव्य त्वरित मागे घेण्यात यावे, अशी मागणी ही मार्डने केली आहे.
'मार्ड'चे मुख्यमंत्र्यांना पत्र हेही वाचा -पार्थ पवार भाजपात येत नाही आणि भाजपही त्यांना पक्षात घेत नाही - खासदार गिरीश बापट
कोरोनाच्या काळात सर्व डॉक्टर जीवाची बाजी लावून कोरोनाशी दोन हात करत आहेत. कित्येक डॉक्टर कोरोनाशी लढताना मृत्यूमुखी पडले आहेत. तर, कोरोनाला हरवून लगेचच डॉक्टर पुन्हा रुग्णसेवा देत आहेत. कोरोनासारख्या महामारीत डॉक्टरच महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचा कोरोना योध्दा म्हणून मुख्यमंत्री सातत्याने गौरव करत आहेत. अशावेळी राऊत यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी "डॉक्टरांना काय कळते, त्यांच्यापेक्षा कंपाऊंडरला जास्त कळते" असे विधान करणे योग्य आहे का? असा सवाल मार्डने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
कोरोना काळात डॉक्टरांविरोधात राऊत यांनी असे विधान करत तरुण डॉक्टरांचे खच्चीकरण केले आहे. तर कोरोना काळात डॉक्टरांचे मनोबल कमी करणारे आहे. त्यामुळे हे विधान त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी सेंट्रल मार्डने केली आहे. दरम्यान राऊत यांचे हे विधान समाज आणि नागरिकांच्या आरोग्यदृष्ट्या घातक आहे. कारण त्यांचे हे विधान मान्य करत भोळी भाबडी जनता बोगस डॉक्टर म्हणजेच कंपाऊंडरकडून इलाज करून घेऊ लागले तर काय होईल, असा सवालही निवासी डॉक्टरांनी विचारला आहे. त्यामुळेच काही निवासी डॉक्टरांनी याप्रकरणी राऊत यांनी डॉक्टरांसह सर्वसामान्यांचीही माफी मागावी, अशी मागणी केली आहे.