मुंबई -महाराष्ट्र विधानसभेसाठी सोमवारी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. निवडणुकीचा निकाल गुरूवारी २४ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. मात्र, त्याआधी कोणाच्या पारड्यात किती मते पडू शकतील याचे अंदाज बांधले जात आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यमांच्या मतदानोत्तर चाचण्या जाहीर झाल्या आहेत. राज्यात या संस्थांनी केलेल्या सर्व्हेनुसार यंदा शिवसेनेला सर्वाधिक फायदा होताना दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका बसत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मात्र या सर्व अहवालांवर आक्षेप घेत निकाल वेगळे लागतील असे म्हटले गेले. यामुळे राष्ट्रवादीचा हा आशावाद पाहून 'राष्ट्रवादी पण प्रचंड आशावादी' असे म्हटले जात आहे...
हेही वाचा... शरद पवारांनी 15 दिवसात घेतल्या 60 सभा अन् दोन रॅली
काय सांगतायत एक्झिट पोल ?
सीएनएन न्यूज १८, एबीपी-सीवोटर, टाइम्स नाऊ, TV ९ - सिसेरो, झी- पोल डायरी, News १८-इपसोस, रिपब्लिक-जनता की बात आदी संस्थानी व माध्यम संस्थांनी केलेल्या सर्वेतून महाराष्ट्राच्या संभाव्य निकालाबाबत आकडेवारी मांडली. ताज्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये यंदा भाजपला १४६ जागा मिळताना दिसत आहेत. तर शिवसेनेला ८४, काँग्रेसला २१, राष्ट्रवादीला २७ आणि इतरांना १० जागा मिळताना दिसत आहेत. या सर्व्हेनुसार भाजपला यंदा २४ जागांचा लाभ होताना दिसत आहे. मात्र या सर्व एक्झि़ट पोल आणि चर्चांना राष्ट्रवादीने मात्र निरर्थक ठरवले आहे.
हेही वाचा... महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन
राष्ट्रवादीला का वाटतंय निकाल वेगळा असेल?
2014 च्या चुका न गिरवता या वर्षी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत निवडणूकीपूर्वीच आघाडीची घोषणा केली. यामुळे बहुसंख्य ठिकाणी बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादीला यश आले. जागा वाटपानंतर महत्वाचा मुद्दा होता तो, उमेदवारीचा. याबाबतीत राष्ट्रवादीने कमालीचे राजकीय चातुर्य दाखवलेले दिसते. प्रामुख्याने पक्षाचे आमदारांचे मोठ्या प्रमाणात झालेले आऊटगोईंग अनुभवल्यानंतर राष्ट्रवादीने एका नव्या नेतृत्वाला उभारी देण्याचा मार्ग अवलंबला. यामुळे सर्वाधिक तरूण उमेदवारांची संख्या देखील राष्ट्रवादीत असल्याचे पहायला मिळत आहे. तसेच शिवसेना आणि भाजपच्या बंडखोरांना हाताशी धरत राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे या निवडणूकीत पक्षीय राजकारण आणि उमेदवारी बाबतीत राष्ट्रवादीने स्वतःला मोठ्या प्रमाणात संरक्षित करण्याचा प्रयत्न केला.