मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी स्वबळाच्या विधानानंतर थेट मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र यानंतर नाना पटोलेंनी स्वतः स्पष्टीकरण देत महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असे म्हटले. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचे म्हटले आहे.
थोरातांचे स्पष्टीकरण
बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकार मजबूत असून तिन्ही पक्षांमध्ये कसलाही कलह नसल्याचे स्पष्ट केले. हे सरकार निश्चितपणे राज्याच्या विकासासाठी काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत नाना पटोलेंच्या विधानामुळे सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
नाना पटोलेंकडून सारवासारव
लोणावळ्यात केलेल्या विधानानंतर सुरू झालेल्या चर्चांनंतर सोमवारी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनीही सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला लागल्याने भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे असा आरोप त्यांनी केला. तसेच मेळाव्यातील आपल्या विधानाचा विपर्यास केला जात आहे असे ते नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. महाविकास आघाडी एकदिलाने काम करत असून हे सरकार पाच वर्षे टिकेल यात कसलिही शंका नाही असेही पटोले म्हणाले.