मुंबई -राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज्यपाल नामनिर्देशित 12 सदस्यांबाबत राज्यपालांनी नेमका काय निर्णय घेतला आहे याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा -देशात सप्टेंबरमध्ये सरासरीहून अधिक पाऊस होईल- भारतीय हवामान विभागाचा अंदाज
- 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्याबाबत चर्चा?
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेऊन या संदर्भात वेळ मागितली होती. या नंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना 1 सप्टेंबरला भेटण्याची वेळ दिली होती. त्यानुसार आज संध्याकाळी साडेसात वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्द्याबाबत चर्चा केली असल्याचे समजते.
- राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका -
12 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांची भेट घेऊन पत्र दिलं होतं. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मुद्द्यावर राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानेही बारा सदस्यांच्या नियुक्तीबाबत एवढा वेळ लागायला नको होता असं निरीक्षण नोंदवलं. तसेच 15 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना काँग्रेस नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत निर्णय केव्हा घेणार? असा सवाल केला होता.
- राज्य सरकार काही विचारत नाही - राज्यपाल
त्यावेळेस राज्यपालांनी, राज्य सरकार काही विचारत नाही. तर तुम्ही प्रश्न का विचारता? असा उलट प्रश्न केला होता. त्यानंतरच राज्य सरकारकडून राज्यपालांची भेट घेऊन या प्रश्नासंबंधी चर्चा करणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं त्यानुसार आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांची भेट घेणार आहेत.
हेही वाचा -मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती संभाजीराजे घेणार राष्ट्रपतींची भेट, राज्यातील प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी असणार उपस्थित