मुंबई- कोरोना सारख्या संकट काळात आपली सेवा बजावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांपासून वेतन मिळालेले नाही. ७ जून रोजी मिळणारा पगार महिना अखेरपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्ये प्रचंड नाराजीचे वातवरण निर्माण झाले आहे. या नाराजीतूनच कर्मचाऱ्यांनी आता पगार मिळावा यासाठी थेट महादेवाला अभिषेक घालून साकडे घातले आहे. या उपरोधिक आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संदेश शासनाकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
पगारासाठी घातला महादेवाला अभिषेक अनेक वेळा एसटी कर्मचाऱ्यांना थकीत वेतन त्वरित मिळावे यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्यावतीने राज्य सरकारला पत्रव्यवहारही करण्यात आला होता. त्यानंतर ६०० कोटी रुपयांचा निधीही शासांकडून मजूर केला आहे. मात्र, आतापर्यत हा निधी महामंडळाकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे. तसेच एसटी महामंडाळाच्या कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
९७ हजार कर्मचारी आक्रमक -
कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. परिणामी कामगारांचे वेतन थकीत होते. त्यामुळे गेल्या वर्षी एसटी बस वाहतूक बंद असताना शासनाकडून मिळालेल्या १ हजार कोटी रुपयांच्या निधीतून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले होते. मात्र, आता हा निधी सुद्धा संपला असून कर्मचाऱ्यांचा वेतनाचा आणखी प्रश्न निर्माण झालेला आहे. या महिन्यात बस सुरू झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा ७ तारखेला होणारा पगार झालेला नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी कांग्रेस संघटनेसह सर्व संबंधितानी केलेल्या प्रयत्नामुळे शासनाने ६०० कोटी रुपये निधी मंजूरही केला आहे. पण तरीही तो एसटी महामंडळाकडे वर्ग न झालेला नाही. त्यामुळे महामंडळातील ९७ हजार कर्मचारी आणि अधिकारी यांचे वेतन थकीत आहे.
शासनाला सुबुद्धी मिळो -
मंगळवारी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने कर्मचाऱ्यांनी मुंबई सेंट्रल येथे कोरोना प्रादुर्भाव संबंधित सर्व नियमांचे पालन करून महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करीत "शासनाला सुबुद्धी मिळो, आणि पगार लवकरात लवकर होऊ दे, असे साकडे घातले. तसेच शासनाला प्रतिकात्मक संदेश देण्यात आला आहे. अचानक शासनाकडून ३०० कोटी रुपये एसटीकडे वर्ग करण्याचे आदेश प्राप्त झाले. खरे तर हा निधी शासनाकडून मिळणारच होता. पण तो आजपर्यंत एसटी महामंडळाकडे वर्ग झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत आहे. हा निधी तात्काळ मिळावा यासाठी महादेवाला घातलेला अभिषेक हा प्रतिकात्मक होता. यातून शासन व एसटी प्रशासन याना संदेश पोहोचविण्याचा उद्देश होता, अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.
३०० कोटी निधी प्राप्त, कामगारांना लवकरच वेतन मिळेल- परब
कोरोनाच्या संकटामुळे एसटी महामंडळ आर्थिक गर्तेत सापडले आहे. त्यासाठी मी माननीय अर्थमंत्री श्री. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. त्याअनुषंगाने दिनांक ९ जून २०२१ रोजी शासनाने एसटी महामंडळाला ₹ ६०० कोटींची आर्थिक मदत करण्याचे मान्य केले होते. त्यापैकी ३०० कोटींचा निधी मंगळवारी महामंडळास प्राप्त झाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन लवकरच त्यांना मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.