मुंबई- मुख्यमंत्र्यांसह सहा सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगितले. राज्याचे मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शपथ घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. समन्वय समिती ही तीन पक्षांचे मिळून बनलेल्या सरकारला उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांच्या इच्छेप्रमाणे सरकारची स्थापना झाल्याचे मला वाटते. मुख्यमंत्र्यांनी पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित माहिती देण्याचे मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यासंदर्भातचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. तुमची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे का, असे विचारले असता त्यांनी माहित नसल्याचे सांगितले. त्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. अजित पवारांबाबतही पक्षाचे अध्यक्ष निर्णय घेतील. त्यांना अंतिम अधिकार आहेत. जेव्हा त्यांना वाटेल, तेव्हा ते घोषणा करतील, असेही पाटील यांनी म्हटले.