मुंबई/शिर्डी - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदी विरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी आज राज्यभरात काँग्रेसकडून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली जाणार आहेत. लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणीला सामोरे जात राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीत खपून मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. त्यात नुकताच कुठे चांगला भाव येऊ लागल्याचे दिसत होते. चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती, पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही निर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी करून केंद्र सरकारच्या या अन्यायी निर्णयाविरोधात काँग्रेसच्या वतीने आज (बुधवारी) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिली.
यासंदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, दाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला? त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करु शकत नाहीत, नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांना लकवा झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.