महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

BEST : बेस्टकडून लक्झरी प्रीमियम बस सेवा; गारेगार अन् आरामदायी प्रवास

प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टकडून प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या मोबाइल ऍपवर सीट आरक्षित करून लक्झरी बसने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ओला, उबर पेक्षाही स्वस्त, आरामदायी व गारेगार प्रवास असणार असल्याचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बस सेवा
बस सेवा

By

Published : Apr 26, 2022, 9:22 PM IST

मुंबई- प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सुविधा देण्यासाठी बेस्टकडून ( BEST ) प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या मोबाइल ऍपवर सीट आरक्षित करून लक्झरी बसने प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ओला, उबर पेक्षाही स्वस्त, आरामदायी व गारेगार प्रवास असणार असल्याचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

बेस्ट डिजिटल -बेस्ट उपक्रमाच्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी डिजिटल सेवा दिली जात आहे. यासाठी बेस्टने चलो ऍप ( Chalo App ) आणि स्मार्ट कार्ड प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे. तसेच भारतात सर्व ठिकाणी चालेल असे वन नेशन वन कार्डही प्रवाशांना उपलब्ध करून दिले आहे. बेस्टच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एसी करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. सध्या बेस्टने ३२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

दोन हजार बसेस -बेस्टकडून प्रवाशांच्या सोयीसाठी लक्झरी प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी प्रवाशांना ऍप वरून तिकीट आणि सीट बुकिंग करता येणार आहे. या सेवेमुळे ओला ( OLA ), उबर ( Uber ), टॅक्सी ( Taxi ), रिक्षा ( Auto Rikshaw ) याकडील प्रवासी बेस्टकडे वळेल. त्यांना आरामदायी आणि गारेगार प्रवास करता येईल, असे चंद्र यांनी सांगितले. बस कुठपर्यंत आली आहे, बसमध्ये किती गर्दी याची सविस्तर माहिती एॅपवर मिळणार असल्याचे ते म्हणाले. पुढील चार महिन्यांत दोन हजार लक्झरी बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सामील होणार असून पहिल्या टप्प्यात २०० बसेस लवकरच सामील होणार असल्याचे चंद्र यांनी सांगितले.

प्रदूषणमुक्त मुंबईचे उद्दीष्ट -मुंबईतील प्रदूषणात वाढ होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक बसेसचा समावेश बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात केला जात आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासह खासगी वाहनाने न जाता सार्वजनिक वाहनांचा वापर करावा, यासाठी लक्झरी प्रिमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.

हेही वाचा -Kirit Somaiya : 'माझ्यासह माझ्या कमांडोच्या देखील हत्येचा प्रयत्न'

ABOUT THE AUTHOR

...view details