मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन वाढवला आहे. 'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध 1 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आज याचा शासन आदेश काढण्यात आला.
राज्यात 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही वर्गाला दिलासा देण्यात आलेला नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉक डाऊन वाढविण्यासंदर्भात सर्वच मंत्र्यांचं एकमत झाले होते. त्यामुळे राज्यामध्ये अजून पंधरा दिवस लॉकडाउन वाढवण्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून कालच देण्यात आले होते.
याआधी राज्य सरकारकडून लॉकडाऊन संबंधी ज्या गाईडलाईन देण्यात आल्या होत्या, त्या सर्व गाईडलाईन या लॉकडाऊनमध्ये देखील लागू असणार आहेत. कोणत्याच वर्गाला कसलाही दिलासा या लॉकडाऊन मध्ये देण्यात आलेला नाही. व्यापारीवर्ग किंवा दूध विक्रेते यांनी आपली दुकानं अधिक वेळ सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात यावा, अशा प्रकारची मागणी केली होती. मात्र राज्य सरकारकडून काढलेल्या नवीन आदेशानुसार त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही.
नवीन गाईडलाईनुसार नियम -
- महाराष्ट्रात घोषित केलेल्या संवेदनशील राज्यांतून येणाऱ्या लोकांना RTPCR रिपोर्ट बंधनकारक आहे.
- परराज्यातून मालवाहूतक करणाऱ्यांचा RTPCR रिपोर्ट निगेटीव्ह असावा, तो 7 दिवस ग्राह्य धरला जाणार आहे.
- मालवाहतूक ट्रक मध्ये केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लिनरलाच प्रवेश दिला जाणार.
- बाजारपेठामध्ये गर्दी वाढल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने ती बंद करण्याचा निर्णय घ्यावा.
- विमानतळ आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल आणि मेट्रो मध्ये प्रवास करण्यास परवनागी देण्यात आली आहे.
- पत्रकारांना लोकल प्रवास मिळण्याबाबत कोणताही निर्णय राज्य सरकारकडून अद्याप घेण्यात आलेला नाही.
29 एप्रिल रोजी कोरोना विषाणूच्या प्रसारावर अंकुश लावण्यासाठी हे निर्बंध 15 मे पर्यंत लागू करण्यात आले होते. तसेच नवीन मार्गदर्शक तत्वेही जाहीर करण्यात आली होती. आता हे निर्बंध 1 जूनपर्यंत कायम असतील.
साथरोग अधिनियम-1897, तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तरतुदीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या पत्रकात म्हटले आहे, की 'ब्रेक दि चेन संबंधी 13 एप्रिल 2021, 21 एप्रिल 2021 व त्यानंतर 29 एप्रिल 2021 रोजी घोषित केलेले सर्व निर्बंध 1 जून 2021 पर्यंत लागू राहतील'. शिवाय आणखी काही निर्बंधही लागू करण्यात आले आहे.