अहमदनगर- कोरोनाने पुन्हा एकदा मोठा कहर केला असून गुरुवारी गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 1 हजार 338 जणांचा कोरोना चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर 2020 मध्ये एकाच दिवशी सर्वाधिक 1618 जण बाधित आढळून आले होते. कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतील गुरुवारची ही संख्या उच्चांकी आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनीही चिंता व्यक्त केली आहे. एकट्या नगर शहरात गुरुवारी 24 तासात 457 जणांचा कोरणा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याने महापालिका प्रशासनानेही चिंता व्यक्त केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून दर दिवशी बाधितांची संख्या पहिल्या दिवशीपेक्षा जास्त होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सरासरी शंभर रुग्णांची संख्या मार्च संपत असताना सरासरी आठशेवर गेली आहे.
राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी - CORONA VIRUS CASES IN MAHARASHTRA
17:23 March 26
अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचा उच्चांक; 1 हजार 388 कोरोनाचे नवे रुग्ण
16:11 March 26
नागपुरात कोरोनाचे 47 बळी, रुग्णसंख्या वाढतीच..!
नागपूर- कोरोनाची परिस्थिती नागपुरात दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रुग्णसंख्या तर वाढत असून या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंता वाढली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात 47 जणांचा बळी कोरोनाने गेला आहे. तेच नागपूर जिल्ह्यात 3597 नवीन बाधितांची भर पडली आहे.
14:49 March 26
मुंबईतील कोरोनाची स्थिती काय? पहा महापालिकेचा अहवाल
13:14 March 26
कोल्हारमध्ये 3 दिवसांचा कडक जनता कर्फ्यू
राहता तालुक्यातील कोल्हारमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 3 दिवसांचा कडक जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने व्यापार्यांनी घेतला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडी दिसल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशी माहिती कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी दिली आहे.
13:14 March 26
कोल्हापूर-बेळगाव जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातील सीमा पूर्णपणे बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता बेळगाव जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने बेळगावला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील सर्वच सीमा प्रशासनाने बंद केल्या आहेत. चिक्कोडी, कागवाड, संकेश्वर आणि निपाणी या तालुक्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. काटेरी झाडं आणि माती टाकून या सीमा बंद करण्यात आल्या असून याचे एक्सक्लुझिव्ह फोटो 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागले आहेत. यामध्ये कोल्हापूर-बेळगाव दोन्ही जिल्ह्यामधल्या ग्रामीण भागातील सीमा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे दिसत आहे.
13:14 March 26
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ
भंडारा जिल्ह्यात आज 244 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. या 244 पैकी 117 रुग्ण हे भंडारा तालुक्यातील असून 78 रुग्ण हे एकट्या भंडारा शहरातील आहेत. भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर 9 हॉटस्पॉट भंडारा शहरात शोधून काढण्यात आलेले आहेत. दहा मार्चनंतर भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.
13:14 March 26
सोलापूरात 144 अंतर्गत निर्बंध लागू
सोलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये कलम 144 अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सोलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये प्रत्येक शनिवार- रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. म्हणजेच शहर आणि जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या निर्बंधात अत्यावश्यक सेवा मात्र सुरळीत राहणार आहेत. ग्रामीण भागाचा हे आदेश 31 मार्चपर्यंत लागू असतील. तर शहरासाठी पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश लागू असेल.
13:14 March 26
सोलापूरात दोन मंगल कार्यालयाना सील ठोकले
सोलापूर शहरात वाढत्या कोरोना आळा घालण्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करत आहे. या कोरोना विषाणूचा जबरदस्त फटका लग्न कार्यक्रमाना बसत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन मंगल कार्यालयांना टार्गेट करत आहे. विजापूर नाका पोलिसांनी शहरात प्रसिद्ध असलेल्या दोन मंगल कार्यालयाना सील ठोकले आहे याबाबत अधिकृत माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली.
13:14 March 26
प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग
सिंधुदुर्ग जिह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग येऊ लागला असून जिल्ह्यात आतापर्यंत 27 हजार 859 नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर 5 हजार 832 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्यस्थितीत 4 हजार 512 लसी शिल्लक असून आणखी 20 हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, आता जिल्हा रुग्णालयसह 51 ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून जिह्यातील सर्व 38 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही लसीकरणाची सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली
12:38 March 26
सामूहिक होळी साजरी करू नका - अजित पवार
12:37 March 26
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे केंद्राने लस द्यावी - अजित पवार
12:37 March 26
लॉकडाऊनबाबतचा निर्णय शुक्रवारी घेऊ - अजित पवार
12:35 March 26
ज्यांच्या घरी रुग्णासाठी वेगळी खोली आहे. त्यांनीच घरी उपचार घ्या - अजित पवार
12:33 March 26
बोर्डाच्या परीक्षा नियमानुसार होतील, पालकांची जबाबदारी मोठी आहे - अजित पवार
12:31 March 26
आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी आदेश दिलेत - अजित पवार
12:30 March 26
ग्रामीण भागात सुविधा पुरवण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना - अजित पवार
12:29 March 26
ससून रुग्णालयातील खाटांची संख्या 300 वरून 500 वर नेणार - अजित पवार
12:28 March 26
ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये म्हणून प्रशासन सज्ज - अजित पवार
12:27 March 26
पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम, जंबो रुग्णालय 1 एप्रिलपासून वापरात - अजित पवार
12:26 March 26
सार्वजनिक वाहतूक सुरू राहील - अजित पवार
12:25 March 26
परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नियमांचे पालन केले नाही. तर 1 एप्रिलला कठोर निर्णय घेण्यात येईल - अजित पवार
12:25 March 26
सर्व राजकीय नेत्यांनी खासगी कार्यक्रम रद्द करावे - अजित पवार
12:24 March 26
लग्न समारभांत 50 पेक्षा जास्त उपस्थिती नसावी - अजित पवार
12:24 March 26
लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचा विचार आहे - अजित पवार
12:22 March 26
खासगी रुग्णालयातील 50 टक्के खाटा राखीव - अजित पवार
12:22 March 26
कोरोनासंदर्भात अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत.
12:05 March 26
महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकर सर्व जिल्हाधिकाऱ्यांची कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.
11:14 March 26
घाटकोपरमध्येही एकाच दिवसात 292 कोरोना रुग्ण आढळून आले
मुंबईत वर्षभर कोरोनाचा प्रसार असला तरी गेल्या काही दिवसात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या दोन दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची म्हणजेच 5 हजाराहून रुग्णांची नोंद झाली आहे. घाटकोपरमध्येही एकाच दिवसात 292 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत खाऊगल्ल्यांसह 100 पेक्षा जास्त हॉटेल्स, स्टॉल, फेरीवाले, पानटपरीवाल्यांनी स्वेच्छेने आपले सर्व व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
11:13 March 26
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आठवडा कोरोना आढावा बैठक पुणे येथे सुरू आहे.
11:13 March 26
लसीकरण वाढीवर भर
10 मार्चपासून नवी मुंबई शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. कोरोनाला प्रतिबंधासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार मिशन ब्रेक द चेन प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये टेस्टिंग प्रमाणे लसीकरण वाढीवर भर देण्यात येत आहे. तसेच बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यानुसार कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून 3 लाख 48 हजारांची अवघ्या तीन दिवसात दंड वसुली केली आहे.
10:49 March 26
नवी मुंबई विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई
3 दिवसांत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून 3 लाख 48 हजरांची दंड वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंत 31 हजार 364 जणांवर केलेल्या कारवाईतून एक कोटी 33 लाखापेक्षा अधिक दंड वसुली झाली आहे.
10:09 March 26
कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी - शिवसेना
धुळे जिल्ह्यात कोरोनाची संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, या उपाययोजना अगदीच कमी ठरत आहेत. रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता तातडीने प्रशासनाच्यावतीने कोरोना केअर सेंटरची संख्या वाढविण्यात यावी. तसेच व्हेंटीलेटरची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
09:14 March 26
कोल्हापूर जिल्ह्यात 81 नवे रुग्ण आढळले
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज सुद्धा दिवसभरात 81 नवे रुग्ण आढळले असून 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे आज दिवसभरात तब्बल चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 645 वर पोहोचली आहे.
07:56 March 26
धुळ्यात कोरोना रुग्णांचा आकडा 23 हजार पार
धुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच होळी आणि शब्बेबारत सारखे सण येत आहेत. या सण उत्सवाच्या कालावधीत होणारी गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार 27 तारखेच्या रात्री 8 वाजेपासुन तर मंगळवारी सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात जनता कर्फ्यु जाहिर करण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 23 हजार पार गेला आहे. दररोजचा नवा उच्चांक धडकी भरवणारा आहे.
06:52 March 26
हॉटस्पॉट विभाग
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
06:49 March 26
नांदेड, बीड आणि परभणीत लॉकडाऊन
नांदेडच्या लॉकडाऊन पाठोपाठ परभणीमध्येही वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत प्रशासनाने कठोर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मराठवाड्यातील नांदेड, बीड आणि परभणी या जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
06:48 March 26
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका - 5,505
ठाणे - 449
ठाणे मनपा - 980
नवी मुंबई -756
कल्याण डोंबिवली - 1027
उल्हासनगर मनपा - 116
मीराभाईंदर - 210
पालघर - 140
वसई विरार मनपा -192
रायगड -214
पनवेल मनपा -408
नाशिक -1078
नाशिक मनपा -2304
अहमदनगर - 858
अहमदनगर मनपा - 455
धुळे - 198
धुळे मनपा - 166
जळगाव- 734
जळगाव मनपा - 128
नंदुरबार -531
पुणे - 1340
पुणे मनपा - 3,340
पिंपरी चिंचवड - 1,747
सोलापूर - 315
सोलापूर मनपा - 286
सातारा - 363
औरंगाबाद मनपा -1380
औरंगाबाद -522
जालना -337
परभणी मनपा -402
लातूर मनपा -214
लातूर -305
उस्मानाबाद-178
बीड -345
नांदेड मनपा - 958
नांदेड - 453
अकोला - 142
अकोला मनपा - 322
अमरावती मनपा - 178
यवतमाळ -352
बुलडाणा -602
वाशिम - 311
नागपूर- 1014
नागपूर मनपा -2,656
वर्धा -309
भंडारा -241
चंद्रपूर -107
चंद्रपूर मनपा - 107
06:06 March 26
राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांनी उच्चांक गाठलाय. राज्यात नव्या 35 हजार 952 रुग्णांची नोंद झालीय. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 26 लाख 833 इतकी झालीय. राज्यात सातत्यानं वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेत भर टाकतेय. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध असूनही रुग्णसंख्येला वेसण बसत नाही.
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे.
भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण 8 ते 9 टक्के लोक महाराष्ट्रात राहतात. पण देशात सध्या 60 टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाय योजानाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. जास्त रुग्ण असलेल्या काही शहरांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळण्याकरिता काही कठोर उपाय योजण्यात आल्या आहेत.