मुंबई - गणेशोत्सवासाठी विविध शहरांतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात गावी जात आहेत. परंतु सध्या त्यांची गैरसोय होत आहे. रायगडमधील खारपाडा, रत्नागिरीतील कशेडी आणि सिंधुदुर्गातील खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर पासेसमुळे किंवा प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्यामुळे चाकरमान्यांना आठ-आठ, दहा-दहा तास ताटकळत राहावे लागते. यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी सर्वांनी राज्यपालांना निवेदन दिले.
याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांनी तात्काळ मुख्य सचिवांशी संर्पक साधला. कोकणात जाणाऱ्या व्यक्तींची योग्य काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे दरेकरांनी सांगितले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर गेले दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी खारपाडा, कशेडी, खारेपाटण येथील तपासणी नाक्यांवर भेट देऊन गणेशोत्सवसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांच्या व्यवस्थेची पाहणी केली. चाकरमान्यांना होणा-या त्रासाबद्दल माहिती त्यांनी राज्यपालांना भेटून दिली.
यावेळी आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार कालिदास कोळंबकर, मनिषा चौधरी, सुनिल राणे, राहुल नार्वेकर, मिहिर कोटेजा, पराग शहा उपस्थित होते.