मुंबई - क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीनही मिळाला आहे. या प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी केली असल्याचा गौप्यस्फोट पंच प्रभाकर साईल यांनी केला होता. या आरोपांच्या चौकशीसाठी दिल्लीतून एनसीबीची एक टीम मुंबईत आली होती. त्यानंतर आज समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणासह इतर 5 प्रकरणातून अप्रत्यक्षरित्या दूर कऱण्यात आले आहे. आता पुढील या सहा प्रकरणांचा तपास दिल्लीतील एसआयटी करणार आहे. IPS संजय सिंग हे या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत.
हेही वाचा -आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवले... नवाब मलिक म्हणाले, ही तर फक्त सुरुवात
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेंवर आठ कोटी रुपयांची लाच मागित्याचा आरोप आहे. वानखेडे यांना हटवल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.
- झोनल डायरेक्टर पदी वानखेडे कायम राहणार -
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला असला तरीदेखील ते मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. आता एनसीबीचे केंद्रीय SIT चे पथक आर्यन खान आणि समीर खान, अरमान कोहले यांच्यासह इतर तीन प्रकरणांची चौकशी करणार आहे.
संजय सिंग हे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. त्याआधी त्यांनी ओडिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर त्यांची दिल्ली एनसीबी कार्यालयात बदली झाली होती. सिंग यांनी ओडिशा राज्यात महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. ओडिशामध्ये पोलीस आयुक्तालयातील ड्रग टास्क फोर्स (डीटीएफ) चे प्रमुख असताना, सिंग यांनी राज्यात ड्रगची तस्करी करणारे रॅकेट फोडण्यासाठी अनेक अमली पदार्थ विरोधी मोहिमा सुरू केल्या होत्या. त्यानंतर संजय सिंग यांना सरकारने बढती देत दिल्ली कार्यालयात बदली केली होती. ड्रग्ज टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून अनेक ड्रगसंबंधीचे व्यवहार उघडकीस आणले होते. एनसीबीचे उपसंचालक म्हणून संजय सिंग यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ड्रग व्यापाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते.
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) संजय कुमार सिंग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) आदेशानुसार सिंग यांची नियुक्ती प्रतिनियुक्तीवर करण्यात आली आहे. त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून, 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या म्हणजे त्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते एनसीबीचे उपसंचालक म्हणून काम पाहतील.
- समीर वानखेडेंवर वरील आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक खुलासे केले होते.
हेही वाचा -आर्यन खान प्रकरणातून मला हटवले नाही - एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंची प्रतिक्रिया