मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँड्रिंगद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी केला आहे. याबाबत सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून मुश्रीफ कुटुंबीयांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैय्या हेही वाचा -परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; किरीट सोमय्यांच्या रडारवर 11 मंत्री, सरकारचा डेरा डळमळीत?
- संशयास्पद कंपन्यांबरोबर आर्थिक व्यवहार-
आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये किरीट सोमैय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येत आहे. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसत आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँड्रिंग केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे.
- शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले-
निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतल्याचे दिसते आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले असल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.
- या कंपनीत जमा झालेला पैसे-
या कारखान्याच्या नावावर जमा झालेल्या रकमा मरुभूमी फायनान्सकडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन कन्सल्टन्सीकडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडी एलएलपीकडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्सकडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेसकडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटलकडून २.८९ कोटी.
- २७०० पानांचे पुरावे आयकर विभागाकडे -
किरीट सोमैय्या यांनी सांगितले की, ठाकरे सरकारमधील ११ भ्रष्टाचारी मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या ११ जणांच्या टीममध्ये राखीव खेळाडूंची संख्या वाढायला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचे नाव राखीव खेळाडूंमध्ये आम्ही वाढवत आहोत. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केला असून त्यांच्याविरोधात माझ्याकडे २७०० पानांचे पुरावे आहेत. या सर्व घोटाळ्यांची कागदपत्रे मी ईडी आणि आयकर विभागाला दिली असून, हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -किरीट सोमैयांचा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांवर मनी लाँड्रिंगचा आरोप