मुंबई -शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास घातकी असे संबोधले होते. त्यांच्या या शब्दावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर ( Eknath Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) यांनी आक्षेप घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर कधीही उद्धव ठाकरे यांनी विश्वासच टाकला नाही. मग ते एकनाथ शिंदे यांना विश्वास घातकी कसे म्हणू शकतात? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना देखील त्यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्षात दुसऱ्या स्थानी असेलेल्या एकनाथ शिंदे यांना दिली नाही. स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलून मुख्यमंत्रीपद हव का? असं विचारल्यानंतरही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. मग एकनाथ शिंदे यांना विश्वासघातकी का म्हणता? अनेक महत्त्वाची कामं करायची होती तेव्हा त्यांना एकनाथ शिंदे हवे होते. मात्र, जबाबदारी देण्यावेळी एकनाथ शिंदे आठवले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा किती विश्वास होता असा चिमटाही यांनी काढला आहे.
नातूला शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शब्द टाकला होता -मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांनी दिपक केसरकर यांच्या नातवासाठी त्यांचे खाजगी काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी केले असल्याचा चिमटा काढला होता. मात्र, उद्धव ठाकरे हे आपले नेते होते. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री होते. यामुळे आपल्या नातवाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकला होता. मात्र, मुख्यमंत्री असूनही आपल्या नातवाला उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला नाही. शेवटी त्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला असे स्पष्टीकरण देत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना दीपक केसरकर यांनी चिमटा काढला आहे.
संजय राऊत यांना दिवसा स्वप्न पडत आहे - एकनाथ शिंदे गटात गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार अद्यापही आपल्या संपर्कात आहेत. जवळपास बारा ते चौदा आमदार आपल्यासोबत येतील आणि राज्यामध्ये लवकरच सत्तांतर होईल असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, बंडखोर आमदार गुवाहाटीला असतानाही अशा प्रकारची वक्तव्ये संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या संपर्कात कोणीही नव्हते. तसेच, आताही त्यांच्या संपर्कात कोणीही नाही. मात्र, सत्तांतर होण्याचे केवळ दिवास्वप्न संजय राऊत पाहत आहेत असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला आहे.