मुंबई -आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी टोकदार होण्याची शक्यता आहे. महाड न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. दिवसभर घडलेल्या अटकनाट्यानंतर जामिनावर बाहेर येताच नारायण राणेंनी फक्त दोन शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नारायण राणे यांनी 'सत्यमेव जयते' असं दोन शब्दांचं ट्वीट केले आहे.
नारायण राणे बुधवारी पहाटे 5:00 वाजता मुंबईच्या जुहू येथे घरी पोहोचले आहेत. नारायण राणेंना मंगळवारी दुपारी रत्नागिरीमधून अटक करण्यात आली होती. राणेंना त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. राणेंना पोलीस घेऊन जात असताना राणे समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यापुढे राणे समर्थकांचा विरोध चालला नाही. त्यांच्या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले.
जामीन मंजूर -
अटकेनंतर पोलिसांनी राणे यांना रायगड जिल्ह्यातील महाड दिवाणी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयाकडे राणे यांची 7 दिवसांची कोठडी मागितली होती. राणेंना मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास आहे, यावर त्यांची औषध सुरू आहेत. नारायण राणे यांचं वय आणि प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी राणे यांच्या वकिलाने केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महाड न्यायदंडाधिकाऱ्यानी 15 हजारांच्या जातमुचलक्यांवर त्यांना जामीन मंजूर केला.
नारायण राणेंना न्यायालयाने घातल्या अटी -
महाड न्यायदंडाधिकाऱ्यानी जामीन मंजूर करताना नारायण राणेंना काही अटी घातल्या आहेत. त्यांना 31 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहावे लागले. तर भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली. ही माहिती नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली.
काय म्हणाले होते राणे?
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रायगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. "देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे. बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून...अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", असे पत्रकार परिषदेत राणे म्हणाले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोकणात आलेल्या राणेंनी रायगड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याचा केला. मात्र, तो प्रयत्न त्यांच्या अंगलट आला. या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या अटकेची कारवाई केली.
हेही वाचा -नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO
हेही वाचा -आधी मुख्यमंत्र्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - नितेश राणे