मुंबई -ज्येष्ठ पटकथा लेखक, कवी जावेद अख्तर मानहानी प्रकरणी जावेद अख्तर यांच्याकडून अभिनेत्री कंगना रनौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (मंगळवारी) अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्णय देत जावेद अख्तर यांची मागणी फेटाळून लावली आहे. यामुळे कंगना रनौत यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जावेद अख्तर यांनी कंगना राणावत यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्याचआधारे हा वॉरंट जारी केला जावे, अशी विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती. कंगना या प्रकरणात गेल्या मार्च महिन्यापासून काही ना काही कारण देत जाणीव पूर्वक टाळाटाळ करत आहे. तसे जावेद अख्तर यांच्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज अंधेरी महानगर दंडाधिकारी आर.आर. खान यांनी जावेद अख्तर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने आपल्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून नाहक बदनामी केली, अशी तक्रार जावेद अख्तर यांनी वकिल जय भारद्वाज यांच्यामार्फत केली. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावनीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती.
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही, तर ती माणसे तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्यायसुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.
हेही वाचा -Kalicharan Transit Remand : कालीचरणला महाराष्ट्रात आणण्यासाठी मिळाला ट्रांझिट रिमांड; पुणे न्यायालयात करणार हजर