नवी मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार नागरिकांना विनाकारण बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. याच नियमानुसार नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकात माथाडी व मापाडी कामगारांना अडवल्यामुळे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारकडून कोणत्याही माथाडी कामगाराला अडवण्यात येऊ नये, अन्यथा एपीएमसी मार्केट सुरू करू देणार नाही, असा इशारा दिला आहे.
सानपाडा रेल्वे स्थानकात माथाडी कामगारांना अडवले
नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकात माथाडी कामगार तसेच मापाडी यांना रेल्वेने प्रवास करण्यापासून मज्जाव करण्यात आला तसेच त्यांना अडवण्याचा प्रकार घडला. या कामगारांना रेल्वे स्थानकावर टीसीने अडवले. यावेळी कामगारांना सोडण्याची विनंती केली असता महाराष्ट्र सरकारकडून माथाडी कामगार तसेच नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मुभा असल्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत असे उत्तर देण्यात मिळाले. या प्रकारामुळे माथाडी नेते नरेंद्र पाटील हे संतप्त झाले व आक्रमक होत या प्रकाराचा विरोध केला.
…अन्यथा एपीएमसी सुरू होऊ देणार नाही
माथाडी कामगार आणि मापाडी कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करावा अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. यानंतर माथाडी कामगारांना अडवले तर एपीएमसी मार्केट चालू देणार नाही, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिला.