मुंबई - मुंबईमधील पार्किंगची ( Parking In Mumbai ) समस्या सोडवण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी पे अँड पार्किंग कंत्राट दिले ( BMC Pay Park Scam ) आहेत. यातील कित्येक कंत्राटांचा कालावधी संपला आहे, तर काही ठिकाणी महिला बचतगटांना देण्यात आलेली कंत्राटे सब कंत्राटदाराला देण्यात आली आहेत. पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमताने १०० कोटींचा महसूल बुडत असून पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या १०० कोटींच्या घोटाळ्याला ( BMC 100 Crore Scam ) दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालिकेतील विरोधीपक्षनेते रवी राजा ( Opposition Leader Ravi Raja ) यांनी आज ऑनलाईन पालिका सभागृहात केली.
१०० कोटींचा घोटाळा
मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कबाबत रवी राजा यांनी पालिकेच्या ऑनलाईन सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी बोलताना पे अँड पार्कमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. मुंबई महापालिकेची शहर आणि उपनगरात सुमारे ७५० ते ८०० पे अँड पार्क आहेत. महिलांना सक्षम करावे यासाठी यातील २५ ते ३० टक्के पे अँड पार्क महिला बचतगटांना देण्यात आले आहेत. महिला बचतगटांना जे पे अँड पार्क दिले आहेत त्या बहुतेक ठिकाणी सब कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. विशेष करून एकाच कंत्राटदाराने महिला बचतगटांचे पे अँड पार्क चालवण्यास घेतले आहेत. यामुळे जो पैसा महिलांना जायला हवा तो पैसा सब कॉन्ट्रॅक्टरला जात आहे. पालिकेच्या २४ वॉर्डपैकी ८ ते ९ वॉर्डमध्ये पे अँड पार्कचे कंत्राट संपले आहे. त्याठिकाणी नवे कंत्राट काढण्यात आलेले नाही. जुने कंत्राटदार आणि पालिकेचे अधिकारी मिळून पे अँड पार्कच्या पैशांनी आपली घरे भरत आहेत. यामुळे पालिकेला वर्षाला जे १०० कोटींचे उत्पन्न मिळायला हवे ते कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहेत. पालिकेच्या पे अँड पार्कमध्ये एकाच व्यक्तीची वर्षानुवर्षे मक्तेदारी आहे. पे अँड पार्कचे कोणतेही कंत्राट याच व्यक्तीला मिळते. यामध्ये अधिकारी आणि कंत्राटदारांचे साटेलोटे असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला.