मुंबई-मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या घटनेला लवकरच पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने भारत आपल्या दुसऱ्या चंद्रवारीला सुरूवात करणार आहे. भारताच्या या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ मोहिमेची तारीख इस्रोने जाहीर केली आहे. त्यानुसार आंध्र प्रदेशमधल्या सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरीकोटा येथून येत्या १५ जुलैला पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी भारताचं चांद्रयान-२ हे यान अवकाशात झेपावेल.
जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपक यानाच्या साहाय्याने चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि लँडर पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावतील आणि नंतर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येतील. चांद्रयान-२ च्या निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. चांद्रयान-१ च्या यशानंतर अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' चांद्रयान-२' च्या निमित्ताने दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.
चांद्रयान-२ च्या निमित्ताने भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा जगातील पहिलाच देश ठरणार आहे. असे आहे चांद्रयान - २
चांद्रयान-२ चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे प्रमुख तीन भाग आहेत. यातील ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो आणि लांबी १ मीटर इतकी आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर इतकी आहे. चांद्रयान-2 मध्ये 13 उपग्रहांचाही समावेश असून, या यानाचे सगळे वजन तब्बल 3.8 टन इतके असणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मते, हे वजन 8 हत्तींच्या भाराएवढे आहे.
भारताचे चांद्रयान -२ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे यान आहे. भारताला या मोहिमेसाठी एकूण ९७८ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. याआधी 'नासा'ने 1969 मध्ये अपोलो हे यान चंद्रावर पाठवले होते. त्यासाठी 2 हजार 620 कोटींचा खर्च आला होता. इस्रोच्या या मोहिमेत त्या तुलनेत अतिशय कमी म्हणजे 1 हजार कोटींचा खर्च आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते ही रक्कम हॉलिवूडच्या एका चित्रपटाच्या निर्मिती खर्चापेक्षाही कमी आहे. भारताच्या या अवकाश मोहीमेमध्ये इस्रो सोबतच देशातील ५०० विद्यापीठे, संशोधन संस्था व १२० खासगी उद्योगांचा सहभाग आहे.
चांद्रयान-१ आणि मंगलयानच्या यशानंतर भारत आता पुन्हा एकदा नव्या मोहीमेसाठी सज्ज झाला आहे. भारताच्या या मोहिमेसाठी अवकाश संशोधकांना ईटीव्ही भारतच्या शुभेच्छा !