मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान विषाणूने अनेकवेळा आपली रूप बदलली आहेत. मुंबईमध्ये नुकतीच जिनोम सिक्वेंसिंग चाचणी ( Genome Sequencing ) करण्यात आली. त्यामध्ये साऊथ आफ्रिका ( South Africa ) येथून भारतात आलेल्या एका महिलेला कोरोनाच्या 'एक्सई' या व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या महिलेला कोणत्याही प्रकारची लक्षणे नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. भारतातील 'एक्सई' व्हेरियंटची ही महिला पहिला रुग्ण ( First Case XE Variant In Mumbai ) आहे.
महिलेला एक्स ई या व्हेरियंटची बाधा -साऊथ आफ्रिका येथून विमान प्रवास करून भारतात आलेल्या एका ५० वर्षीय महिलेला कोरोनाच्या 'एक्सई' या व्हेरियंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. ही महिला कॉस्ट्यूम डिझायनर आहे. आपल्या सहकाऱ्यांसोबत शुटिंगसाठी ती १० फेब्रुवारीला भारतात आली होती. मुंबई विमानतळावर तिची चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोना संसर्गित आढळून आली नव्हती. २ मार्चला तिने आपली चाचणी सबर्बन डायग्नोस्टिक मधून केली असता ती कोरोना संसर्गित आढळून आली. संसर्गित आल्याने तिला ताज हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात आले होते. दुसऱ्याच दिवशी तिने पुन्हा स्पाईस हेल्थ मधून आपली चाचणी केली. त्यामध्ये तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.