मुंबई -राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. मंगळवारी सभागृहात या विषयांवरील प्रस्ताव मांडून त्यावर सविस्तर चर्चा करायला परवानगी दिली जाईल, असे सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी मात्र यावर आक्षेप घेत आजच चर्चा घडवून आणा, अशी मागणी लावून धरली होती. सभापतींनी ही मागणी फेटाळून लावल्याने विरोधक आक्रमक झाले आणि सभागृहात उतरून घोषणाबाजी केली. यावेळी उडालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आज सोमवारी दिवसभरात सहा वेळेस तहकूब करण्यात आले.
हेही वाचा -ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरी मागे हटणार नाही -देवेंद्र फडणवीस
विधान परिषदेच्या कामकाजातील महत्त्वाचे मुद्दे -
- मराठी भाषा भवनसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.
- जीएसटी संदर्भातील विधेयक मंजूर
- केंद्राकडून इम्पेरिकल डाटा मिळवण्यासाठी ठराव करण्यात आला आहे.
- सरकार आणि विरोधी पक्षांची सभापती दालनात बैठक घेऊन तोडगा काढू, अशी सूचना सभापती निंबाळकर यांनी केली.
- मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, असे निवेदन मराठा उपसमिती समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केले.
- स्वप्नील लोणकर आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. या आत्महत्येसाठी प्रवीण दरेकरांनी राज्य सरकारला जबाबदार धरले.