मुंबई -आगामी महापालिकांच्या निवडणुकांसाठी मनसेकडून मोर्चे बांंधणीला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी 11 वाजता मनसेची महत्त्वाची बैठक वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पार पडली. या बैठकीसाठी पक्षप्रमुख राज ठाकरे आणि पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती.
स्थानिक पातळीवरील निवडणुका लढवण्यासाठी पक्षाने काय तयारी केली आहे, यासह पक्ष संघटनावर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकींसाठी टीम स्थापन करण्याचे आदेश देखील राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांना दिले आहेत. येणाऱ्या काळात औरंगाबाद, नवीमुंबई, नाशिक या काही महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी नेत्यांना दिले आहेत. तसेच निवडणुकांसाठी टीम देखील स्थापण करण्यात येणार आहे. या टीममध्ये स्थानिक नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कार्यकर्ते यांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक शहरानुसार ही टीम तयार करण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत. शिवाय बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आणखी एक बैठक होणार आहे.