मुंबई - महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर अधिकाऱ्यांची फळी बदलण्याचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी ९ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर पुन्हा शुक्रवारी अन्य ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे. यात नांदेड जिल्हाधिकारीपदी असलेले अरुण डोंगरे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान संस्था शिर्डी या पदावर केली आहे.
सनदी अधिकार्यांच्या बदल्यांचा सपाटा तिसऱ्या दिवशीही सुरूच
सनदी अधिकार्यांच्या बदल्यांचा सपाटा तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला. शिर्डी संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अरुण डोंगरे यांची नियुक्ती झाली असून मुख्यमंत्र्यांनी ५ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
एक महिन्यापूर्वी सोलापूर जिल्हाधिकारी पदावरून राजेंद्र भोसले यांची बदली होऊन त्यांना सहव्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी कल्याण येथे नियुक्त केले होते. त्यांची पुन्हा बदली करून पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त केले आहे. नागपूर मनपा आयुक्त पदावरून उचलबांगडी केलेले अभिजित बांगर यांची बदली नागपूर येथे वस्त्रोउद्योग विभागाच्या संचालक पदावर झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती असलेले गोविंद बोडखे यांची सहव्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती कंपनी कल्याण येथे नियुक्ती केली आहे. नुकत्याच सनदी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या वाशीम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचीही बदली झाली आहे. त्यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.