मुंबई -भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी काल 'मला माजी मंत्री म्हणू नका', असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'चंद्रकांत पाटील हे राजकीय विरोधक जरी असले, तरी ते आमच्या सर्वांचे चांगले मित्र आहेत. आमच्या त्यांना कायम सदिच्छा आहेत, काल ते म्हणाले 'मला माजी मंत्री म्हणू नका', ही माजी म्हणून घ्यायची वेदना मी समजू शकतो, पण मी त्यांना निरोप पाठवला आहे, की पुढील पंचवीस वर्ष तुम्हाला माजी म्हणूनच राहावे लागेल, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सरकार किमान पंचवीस वर्षे चालवू, त्यामुळे पंचवीस वर्ष मनाची तयारी ठेवा, ते जर स्वप्न पाहत असतील तर त्यांना बघू द्या, अजून तरी स्वप्नावर कोणताही टॅक्स लावलेला नाही, असे म्हटले. तसेच चंद्रकांत पाटील हे नागालॅंडचे राज्यपाल होणार असल्याची मला मिळाली, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इंधन दरवाढीवरून मोंदींना टोला -
आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना शुभेच्छा दिला आहेत. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच देशातल्या महागाईविरोधात जनतेच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे मोदीजी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील, अशा खोचक टोलाही संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.