मुंबई -शहरात झोपडपट्ट्यांमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंना संरक्षण देण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला आहे. यात भाडेकरू ज्या झोपड्यांमध्ये राहत आहेत, त्यांच्यासाठी 'राहील त्यांचे घर' अशी योजना लवकरच राबवली जाणार आहे. अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी केली. आव्हाडांच्या घोषणेमुळे मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंना त्यांच्या घराचे मालक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा... 'मुल्लाची धाव ही मशिदीपर्यंत त्याचप्रकारे मोदींची धाव फक्त पाकिस्तानपर्यंतच'
गृहनिर्माण मंत्री म्हणून कामकाज हाती घेतल्यानंतर मागील महिन्याभरात ३३ हून अधिक निर्णय घेण्यात आले, त्याची माहिती देण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी आव्हाड यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहील त्याचे घर ही घोषणा केली.
'जे लोक मुंबईतील झोपडपट्ट्यामधे आपली घरे कायम ठेवून इमारतीमध्ये राहायला गेलेले आहेत आणि जे भाडेकरू अजुनही त्या घरात राहतात, अशा भाडेकरूंना उद्या एसआरए आणि इतर योजना आणल्या गेल्यास ते उघड्यावर येतील. म्हणून त्यांना संरक्षण देण्यासाठी ही योजना आणली जाणार आहे. त्यात कोणताही बदल केला जाणार नाही' अशी ठाम भूमिका आव्हाड यांनी मांडली.
हेही वाचा... '... तर पाकिस्तानी नागरिकांनाही चीनमधून बाहेर काढू'