मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा आज वाढदिवस आहे. रामदास आठवले हे आपल्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. काव्यात्मक अंदाजात प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणाऱ्या आठवलेंना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हलक्या फुलक्या पद्धतीने काव्यात्मक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'राजकारणातील कवी दबंग' असा त्यांनी रामदास आठवले यांचा उल्लेख केला आहे.
अनिल देशमुख कवितेत म्हणतात....
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी
बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी
पण आज दिवस आहे जल्लोषाचा
कारण वाढदिवस आहे भारी कवीचा
युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग
आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग
आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
यापूर्वीही दिल्या होत्या अशाच शुभेच्छा -
रामदास आठवले यांना ऑक्टोंबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुख काव्यत्मक पद्धतीनेच त्यांना सदिच्छा दिल्या होत्या. ‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा, धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का’ असे ट्विट करत अनिल देशमुख यांनी रामदास आठवले यांना लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या होत्या.
संघर्षदिन म्हणून वाढदिवस साजरा -
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रिपदाची धुरा वाहणारे रामदास आठवले रिपाइंचे अध्यक्ष आहेत. त्यांचा वाढदिवस रिपाइं तर्फे दरवर्षी संघर्षदिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या संकट काळात रामदास आठवले यांनी दिलेला 'गो कोरोना कोरोना गो' चा नारा देशभर प्रसिद्ध झाला होता.