मुंबई- पावसाळ्यात समुद्राला भरती असताना मोठा पाऊस आल्यास मुंबईत पाणी साचते. तसेच समुद्रात उंच लाटा निर्माण होतात. अशावेळी समुद्र किनारी किंवा समुद्रात जाणे धोकादायक असते. यंदा पावसाळ्यातील 22 दिवस मोठी भरती असून त्यापैकी या आठवड्यात सलग सहा दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईची तुंबई -समुद्रात भरती असताना पाण्याची पातळी वाढते. भरतीच्या वेळी समुद्रात उंच लाटा येतात. 4.5 मीटर पेक्षा उंच लाटा असल्यास त्याला मोठी भरती असे बोलले जाते. मोठ्या भरतीच्यावेळी समुद्र किनारी किंवा समुद्रात जाणे धोकादायक असते. तसेच यावेळी मोठा पाऊस पडल्यास मुंबईतील पाणी शहरातच साचते. मुंबईतील नाल्यांमधून पावसाचे पाणी समुद्रात सोडले जाते. त्यासाठी असलेल्या 186 पातमुखांपैकी 45 पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर 135 पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. याचाच अर्थ केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. त्यामुळे भरतीच्यावेळी समुद्राचे पाणी शहरात शिरते. ते समुद्रात सोडणे शक्य नसल्याने मुंबईची तुंबई होते.