मुंबई : शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रक्रिया आणि पातळीवर त्यांना झालेली मदत ( Supreme Court help ) पाहता, शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ( Shiv Sena Bow And Arrow Symbol ) काढून घेण्याचा प्रयत्न होईल. कायद्याने लढा देऊच मात्र दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत शिवसेनेला नवे चिन्ह मिळाल्यास कमी कालावधीत ते घरोघरी पोहोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांनी केले आहे. गुरुवारी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मातोश्री येथे बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते.
बंडखोरांचा चिन्हावर दावा : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना आपल्या सोबत घेत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचत, स्वतः मुख्यमंत्री बनले. या सर्व प्रक्रियेला न्यायालयाच्या पातळीवर त्यांना मदत झाली. हे सर्व प्रकरण पाहता, शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील काढून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी यावर भूमिका स्पष्ट केली.
सर्व पातळीवर बंडखोरांना मदत :उद्धव ठाकरे म्हणाले की, कायद्याने लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचवा. शिंदे गटाकडे सध्या शिवसेनेचे ४० आमदार तर इतर पक्ष आणि अपक्ष असे मिळून ५० आमदार आहेत. मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.
उद्धव ठाकरेंची सावध भूमिका : सोबतच शिवसेना पक्षाचे चिन्ह शिंदे गटाकडून काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही गळाला लावण्यासाठी शिंदे गटाने जाेर लावला आहे. आजवर सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर बंडखोरांना सर्व प्रक्रियेत झालेली मदत चिन्हांवर गंडातर येऊ शकते, याची जाणीव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना झाली आहे. त्यामुळे ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे समजते.