मुंबई -दरवर्षी रेल्वेकडून लाखो रुपये खर्च करून मान्सून पूर्व तयारी केली जाते. मात्र,'तौक्ते' चक्रीवादळामुळे मध्य रेल्वेच्या कामाची पोलखोल झालेली आहे. पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी झाड्यांचा फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे आज सकाळपासून ते दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीन-तेरा वाजले होते.
चक्रीवादळामुळे मुंबईत मुसळधार पाऊस.. पावसात रेल्वेची दाणादाण - तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईत कहर
दरवर्षी रेल्वेकडून लाखो रुपये खर्च करून मान्सून पूर्व तयारी केली जाते. मात्र,'तौक्ते' चक्रीवादळामुळे मध्य रेल्वेच्या कामाची पोलखोल झालेली आहे. पहिल्या पावसामध्ये अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी झाड्यांचा फांद्या कोसळल्या आहेत.
मान्सून पूर्व तयारीचा पूर्णत: फज्जा -
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'तौक्ते' चक्रीवादळाचा फटका सकाळपासून मुंबईला बसला आहे. विशेष या चक्रीवादळाचा परिणाम रेल्वे वाहतुकीला बसला असून रेल्वेचा मान्सून पूर्व तयारीचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. आज सकाळपासून रेल्वे रूळावरआणि लोकल गाडयांवर झाड्यांच्या फांद्या कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प पडली होती. पावसामुळे अनेक रेल्वे गाड्यांच्या ओव्हर हेडमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. त्यामुळे काही कालावधीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. तसेच सकाळी 11 वाजताच्या सुमारास वादळ वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील लोहमार्ग पोलीस ठाणे आणि तिकीट खिडकी येथील छप्पर उडाले आहे. विशेष मुसळधार पावसामुळे, मस्जिद स्टेशनजवळ पाणी भरल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हार्बर लाइनची वाहतूक सीएसएमटी ते वडाळा स्टेशन दरम्यान दुपारी १.२० वाजल्यापासून बंद केली आहे.
झाड्यांच्या फांद्या कोसळल्या -
दरवर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वे मान्सूनपूर्व तयारीसाठी लाखो रुपये खर्च करून नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हर हेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र, यंदा झाडांच्या फांद्याची छाटणी संथगतीने सुरु असल्याने रेल्वे मार्गावर झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. घाटकोपर, डोंबिवली आणि दादर रेल्वे तांका दरम्यान मोठ्या प्रमाणात झाड आणि झाडाच्या फांद्या कोसळल्याच्या घटना घडलेल्या यांच्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प पडली होती.