मुंबई -मागील तीन दिवसांपासून मुंबईत सकाळी उन आणि संध्याकाळी आकाशात काळे ढग जमा होत अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज शुक्रवारी हवामान विभागाने मुंबईत वादळी वारीसह जोरदार पाऊस पडेल असा इशारा दिले होता. त्यानुसार संध्याकाळी तासभर जोरदार पाऊस पडला. शहर विभागात शहर ०.७६, पूर्व उपनगरात १०.३२ तर पश्चिम उपनगरात १५.२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे घाटकोपर, छेडा नगर, भांडुप, मुलुंड, चेंबूर आदी भागात काही प्रमाणात पाणी साचले. काही वेळ पडलेल्या पावसामुळे रेल्वे व रस्ते वाहतूक मंदावली होती.
विमान वाहतूक विस्कळीत -पावसाचा फटका विमान वाहतुकीला देखील बसला आहे. मुंबई विमानतळावर येणारे आठ विमाने इतर विमानतळावर वळवण्यात आली आहे. तसेच काही विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे.
रस्ते वाहतूकही मंदावली -ऑक्टोबर महिन्यांच्या सुरुवातीला पावसाचा परतीचा प्रवास सुरु होतो. साधारणः दुस-या आठवडानंतर ऑक्टोबर हीट जाणवायला लागतो. मात्र अद्याप पावसाचा मुक्काम कायम असल्याचे चित्र आहे. सकाळी कडक उनामुळे प्रचंड उकाडा जाणवत घामाच्या धारा व संध्याकाळी पावसाच्या जोरदार सरीने वातावरणात हलकासा गारवा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी कोसळलेल्या जोरदार सरीमुळे घरी परतणा-या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांकडे छत्र्या नसल्याने पाऊस थांबेपर्यंत कार्यालयात किंवा इमारतींच्या आडोशाला थांबावे लागले. तासभर पडलेल्या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने सायन रोड नंबर २४, एलबीएस रोड, अंधेरी सबवे आदी ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली होती. त्यामुळे कामावरून घरी परतणा-यांचा खोळंबा झाला.
यलो अलर्ट -मुंबईत पुढील ३ ते ४ तासात ३० ते ४० किलोमिटर वेगाने वादळी वारे वाहू शकतात. विजा चमकत ढगांचा गडगडाट होऊन मध्यम किंवा जोरदार पाऊस पडेल. मुंबई सह पालघर, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणीही अशीच परिस्थिती असेल. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन मुंबई हवामान विभागाने केल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने कळविले आहे. मुंबईत आज १४ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर रोजी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाची नोंद -शहर - ०.७६ मिमी, पूर्व उपनगर - १०.३२ मिमी, पश्चिम उपनगर - १५.२४ मिमी.