मुंबई- मध्य महाराष्ट्र झोडपून काढल्यानंतर पावसाने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे. मुंबईमध्ये बुधवारी मध्यरात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री 12 वाजल्यापासून विजेचा कडकडाटासह उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला. आज दिवसभर मुंबईसह कोकण भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.
बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून आज सकाळी 7 वाजेपर्यंत शहरात 105.92 मि.मी. तर पूर्व उपनगरात 69.18 मिमी, पश्चिम उपनगरामध्ये 58.24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत पावसाने उसंत घेतली आहे. तर काही ठिकाणी रिमझीम पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने रात्री किंग सर्कल, सायन, हिंदमाता दादर आदी सखल भागात पाणी साचले होते.
कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्राकडे सरकत आहे. अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान आज कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र, घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच दक्षिण गुजरातच्या किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे. याच बरोबर पुढील १२ तासात मध्य महाराष्ट्रा ताशी 20 ते 30 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.