मुंबई -राज्यात अद्याप डेल्टा प्लस(delta plus varient)चा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नाही. डेल्टा प्लससंदर्भात तपासणी प्रत्येक तालुक्यात सुरू असून प्रत्येक तालुक्यातून शंभर नमुने तपासण्यात येत आहेत. मात्र पूर्वी आढळलेल्या एकवीस रुग्णांव्यतिरिक्त कोणताही नवीन रुग्ण राज्यांमध्ये आढळलेला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -राज्याला सध्यातरी तिसऱ्या लाटेचा धोका नाही, मात्र आम्ही तयार - राजेश टोपे
'लेवल तीनचे निर्बंध लागू राहणार'
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येपैकी 96 टक्के रुग्णसंख्या ही दहा जिल्ह्यांमध्ये आहे. तर उर्वरित 26 जिल्ह्यांमध्ये उरलेली रुग्णसंख्या असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे. मात्र संपूर्ण राज्यांमध्ये लेवल तीनचे निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
'निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेणार'
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोविड परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी घेतला आहे. मात्र अद्याप निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात कोणताही निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात काही संघटनांनी राज्य सरकारशी संपर्क साधला. खासकरून व्यापारी वर्गाने आपली दुकाने सुरू करण्यासाठी अधिकचा वेळ मागितला होता. तसेच लसीचे दोन डोस घेणाऱ्या व्यापाऱ्यांनीदेखील दुकानांचा वेळ वाढवून मागितला होता. मात्र या सर्वबाबतीत टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.