मुंबई -मुंबईत काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शरद पवार यांच्या सहीत राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी, सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. भाजपात येणाऱ्यांची नावेही मला वर्तमानपत्रातून कळतात, असे बोलताच सभागृहात एकच हशा पिकला.
पुस्तक लिहण्याची प्रेरणा मुख्यमंत्र्यांकडून घेतली - हर्षवर्धन पाटील
संसदीय कार्यमंत्री म्हणून दहा वर्ष विधिमंडळात काम केले आहे, पण पुस्तक लिहण्याची प्रेरणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाली. असे हर्षवर्धन पाटील यांनी पुस्तक प्रकाशनावेळी सांगितले. अर्थसंकल्पावर विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुस्तक लिहले आहे. अर्थसंकल्पाचे बारकावे यांनी या पुस्तकात खुलासेवार सांगितले आहेत. यातूनच पुस्तक लिहण्याची प्रेरणा मिळाल्याचे पाटील यांनी सांगितले. मी व्यवसायिक लेखक नाही पण या अनुभवाचा लोकप्रतिनिधी आणि अभ्यासकांना लाभ व्हावा यासाठी हे पुस्तक लिहले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो होते ,पण त्या संदर्भात उलट सुलट बातम्या आल्याचे त्यांनी सांगितले .
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील यांच्या 'विधानगाथा' या पुस्तकाचे प्रकाशन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांची स्तुती करत म्हटले की, संसदीय कार्यमंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी केलेले काम मोलाचे आहे. गेल्या चार वर्षात त्यांच्या सारख्या मंत्र्याची आम्हाला कमतरता भासली. त्यांनी लिहलेले पुस्तक सर्व लोकप्रतिनिधींची विधी मंडळाचे कामकाज समजून घेण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. याबरोबरच त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भावी राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.