मुंबई -महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. त्याबाबची सुनावनी आज न्यायालयात पार पडली. राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. 4 मे रोजी आता त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
शनिवार राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली होती. तेव्हा देखील न्यायालयाने मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज ( 2 मे ) त्यांच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी झाली. मात्र, वेळेअभावी त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे 4 मे ( बुधवार ) पर्यंत त्यांच्या कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिसची समस्या -नवनीत राणांच्या वकिलांनी भायखळा कारागृह अधीक्षकांना पत्र पाठवून तक्रार केली आहे. नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिसची समस्या आहे. जेलमध्ये सतत फरशीवर बसल्याने आणि झोपल्यामुळे ही समस्या वाढत आहे. यामुळे नवनीत राणा यांना 27 एप्रिल रोजी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. जेजेमधील डॉक्टरांनी सिटी स्कॅन करायला सांगितले होते. मात्र, ते अजून झालेले नाही. त्यांना गंभीर दुखण्याने ग्रासले आहे. सिटीस्कॅन न केल्याने उपचार काय करायचा, हे ठरू शकत नाही. आम्ही संबंधित यंत्रणेला अर्ज दिला आहे. पण, त्यावर विचार केला गेला नाही, तर त्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. तसे, झाल्यास त्याला जबाबदार कारागृह प्रशासन असेल, असे पत्रात म्हटले आहे. तसेच, या पत्राची एक प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवण्यात आली आहे.