मुंबई - बकरी ईद संदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे आखली जाणार असल्याची माहिती मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. अस्लम शेख म्हणाले की, कंटेंन्मेंट झोनमध्ये कोणतेही सण साजरे करण्यास परवानगी नसेल. बकरे खरेदी-विक्रीसाठी सरकारच्यावतीने ऑनलाईन प्रणाली स्थापित केली जाईल. कुर्बानीसाठी गर्दी करण्यास सक्त मनाई असेल. देवनार मंडीसारख्या मोठ्या मंडींना परवानगी देण्यात येणार नाही. मार्केट केवळ खुल्या मैदानातच लावले जाईल, असेही शेख यांनी सांगितले.
हेही वाचा -'सरकारने असा नियम करावा, ज्यामुळे बकरी ईदला लोकांना बकरा मिळेल'
कोरोना संकटाचा मुकाबला करण्याचे मोठे आव्हान आहे. सध्याच्या काळात निरोगी जगणे हे महत्त्वाचे आहे. सण उत्सव साजरा करताना गर्दी होऊ न देणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच वाहतुकीमुळे साथीचा रोग पसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्याचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.
मुस्लिम आमदारांसोबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक झाली होती. यावर्षी संकटाचा सामना करून पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात सर्व सण उत्सव साजरे करू. त्यामुळे बकरी ईद निमित्त बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह नको, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत स्पष्ट केले होते.