मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. एनयाएच्या या कारवाईनंतर आता सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना अखेर सरकारला या प्रकरणी झुकावं लागल्याचं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
'सचिन वाझे प्रकरणात अखेर सरकारला झुकावे लागले' - राम कदम राम कदम यांची टीका
सचिन वाझे प्रकरणावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप सरकारविरोधात आक्रमक आहे. भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांवर टीका केली आहे. राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, 'महाविकास आघाडीचा खरा चेहरा हा आता उघड झाला आहे. त्यामुळे या सचिन वाझे प्रकरणात अजून राज्यातील बडे नेते आणि पोलीस दलातील बडे अधिकारी हे अडकणार आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं काम सुरू होतं. आत्ता सचिन वाझे हे फसले असल्याने त्यांना पुन्हा एकदा निलंबित केलं आहे. पण या प्रकरणात जे कोणी असेल त्यांना एनआयए तपासून बाहेर काढेल असा विश्वास आम्हाला आहे' अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली आहे.
वाझेंनी चौकशीत घेतले बड्या अधिकाऱ्याचे नाव
या सगळ्या प्रकरणात NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा -सचिन वाझेंचे अखेर पोलीस खात्यातून निलंबन