महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंची मुंबई महापालिकेच्या शाळेला भेट - सीईओ

पिचाई यांनी मराठी माध्यमाच्या शाळेतील १५० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे आणि त्यांच्या काय अपेक्षा आहेत याची विचारणा केली. अर्धा तासांच्या भेटीत त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांची मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सुंदर पिचाई

By

Published : Mar 9, 2019, 5:32 AM IST

मुंबई - जगातील सर्वात मोठे सर्च इंजीन असलेल्या गुगल या कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज मुंबईतील महापालिका शाळेला भेट दिली. मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या डी. एन. नगर येथील शाळेत येऊन त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. अचानक झालेल्या उपस्थितीमुळे शाळेतील शिक्षक, पालिका शिक्षणाधिकारी आणि विद्यार्थी आश्चर्यचकीत झाले होते तर अनेकांना आपल्या शाळेत सुंदर पिचाई हे आल्याचा अनेकांना विश्वास बसला नव्हता.

पिरामल फाउंडेशन आणि गुगलतर्फे पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘बोलो अॅप’चे अनावरण यावेळी करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव पिचाई भेट देणार असल्याचे कोणालाही सांगण्यात आले नव्हते. यामुळे पालिका अधिकारीही याबाबत अनभिज्ञ होते. यानंतर पिचाई यांनी ट्विट करून या भेटीबद्दल आपले मत मांडले. यात त्यांनी ‘आठवडाभरापूर्वी भारतात ‘बोलो’ या अॅपचे अनावरण करण्यात आले. हे एक रिडिंग ट्युटर अॅप आहे. ज्यामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात आला आहे. याचा वापर करताना काही विद्यार्थ्यांना भेटण्याची आज संधी मिळाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सुखावह होता’ असे त्यांनी म्हटले आहे.

पिरामल फाऊंडेशनच्यावतीने या अॅपचे लॉन्च करण्यासाठी कार्यक्रमाची परवानगी देण्यात आली होती. या कार्यक्रमाला पिचाई यांची उपस्थिती आम्हालाही माहिती नव्हती पण ती खूप आश्चर्यकारक होती, असे पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगितले. महापालिकेच्या शाळा या आता गुणवत्तेच्या दिशेने पडत असून आज सुंदर पिचाई यांच्या भेटीने आमच्या शाळेतील विद्यार्थी आणि पालकांचे मनोबल वाढले असल्याचा विश्वास पालकर यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details