मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत. यासाठी मुंबई महापालिकेने लस विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याची मागणी करण्यात येत होती. त्याअनुषंगाने मुंबई महापालिकेने १ कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. त्याची निविदा प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण होणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.
लसीचा तुटवडा -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. १६ जानेवारीपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. आतापर्यंत २७ लाख लसीची डोस देण्यात आली आहे. दररोज ३० ते ५० हजार लसीकरण केले जात आहे. लसीचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ३० लाख इतकी असून प्रत्येकी दोन डोस द्यावे लागणार आहे. त्या प्रमाणात लसीची आवश्यकता भासणार आहे.
ग्लोबल टेंडर -
मुंबईला आवश्यक त्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना लस मिळताना अडचणी येत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार महापालिकेने एक कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. १८ मे रोजी दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत महापालिकेकडे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव सादर करायचे आहेत. याच दिवशी म्हणजे १८ मे रोजी दुपारी ३ वाजता हे प्रस्ताव उघडण्यात येतील. जर महानगरपालिकेने कार्यादेश दिला तर तीन आठवड्यांच्या आत संपूर्ण साठा संबंधित कंपन्यांना पुरवावा लागणार आहे.