मुंबई - पुण्याहून राजस्थानला जाण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाला वांद्रे स्थानकात चहामध्ये गुंगीचे औषध टाकून आरोपीने तब्बल ४० हजार रुपयांना लुबाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लुबाडलेल्या प्रवाशाचे नाव दिपक शर्मा असून कामानिमित्त ते पुण्याहून राजस्थानला जाण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आले होते.
अशी घडली घटना-
मिळालेल्या माहितीनुसार फसवणूक झालेले प्रवासी दिपक शर्मा हे पुण्यातील आळंदी रोड येथे राहतात. कामानिमित्त राजस्थानला जाण्यासाठी ते वांद्रे टर्मिनसवर आले होते. वांद्रे स्थानकात तिकीट काढण्यासाठी ते रांगेत उभे होते. याच रांगेत आरोपीने दिपक यांच्याशी बोलता-बोलता ओळख काढली. तिकिट काढल्यानंतर गाडी सुटण्यास वेळ असल्याने प्रतीक्षा गृहामध्ये बसलेल्या दिपक यांना संबंधित आरोपीने चहा पिण्याचा आग्रह धरला. तिकिट रांगेत अधिक वेळ बोलत उभे राहिल्याने आरोपीच्या आग्रहाला दिपक यांनीही प्रतिसाद दिला. संबंधित आरोपीने याचाच गैरफायदा घेत चहामध्ये गुंगीचे औषध मिसळले.
३९ हजार रुपये रोख रक्कम लंपास-
चहाचा घोट घेताच दिपक यांना गुंगी आली. दिपक पूर्णपणे बेशुद्ध झाल्याची खात्री करून आरोपीने त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह ३९ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. दिपक यांना शुद्धीवर आल्यानंतर आपल्याला लुटल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ वांद्रे रेल्वे पोलिसांत धाव घेत गुन्हा दाखल केला. तरी याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हेही वाचा-कोरोना निर्बंधासाठी प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश; मुख्य सचिवांनी घेतला राज्यातील जिल्ह्यांचा आढावा