महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Genome Sequencing Result : मुंबईत १८८ नमुन्यांमध्ये ‘डेल्टा’ चे १२८, अल्फाचे २, केपाचे २४ रुग्ण

गेल्या दीड वर्षात कोरोनाने आपले रूप बदलले आहे. त्यासाठी मुंबई पालिकेने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू केल्या आहेत.

CORONA
संग्रहित फोटो

By

Published : Aug 23, 2021, 10:07 PM IST

मुंबई -मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. गेल्या दीड वर्षात कोरोना विषाणूने आपले रूप बदलले आहे. त्यासाठी पालिकेने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात सुरू केल्या आहेत. त्याचा पहिला अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार एकूण १८८ नमुन्यांमध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.

  • जिनोम सिक्वेन्सिंग लॅब -

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या कस्तुरबा रुग्णालयात विषाणुंचे जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजेच जनुकीय सूत्र निर्धारण वैद्यकीय प्रयोगशाळा (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅब) स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक ४ ऑगस्ट २०२१ रोजी त्याचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर सदर यंत्रणा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित (valifation) होवून कार्यान्वित करण्यात आली आहे. अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे हे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे. विषाणूंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्याने, एकाच विषाणूच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील नेमका फरक ओळखता येतो. असा फरक ओळखू आल्यानंतर उपचार पद्धतीची नेमकी दिशा स्पष्ट होते. कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये एकाचवेळी सुमारे ३८४ वैद्यकीय नमुन्यांची तपासणी होऊन ४ दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने राज्याला कोणताही इशारा दिला नाही - राजेश टोपे

  • डेल्टा प्रकाराचे अधिक रुग्ण -

या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये पहिल्याच चाचणी तुकडीचा (फर्स्ट बॅच) भाग म्हणून कोविड बाधा झालेल्या एकूण १९२ रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १२८ रुग्ण हे ‘डेल्टा’ प्रकारातील कोविड विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये अल्फा प्रकाराचे २, केपा प्रकाराचे २४ तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोविड विषाणूने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड संसर्गाच्या सध्याच्या कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य झाले आहे.

  • याचे पालन करा -

दरम्यान, डेल्टा प्रकारातील कोविड विषाणूची वेगाने होणारी लागण लक्षात घेता, कोविड-१९ विषाणू प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यासारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा -नाशिककरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती; मुहूर्त नसताना लग्नाचे उडवले जातायेत बार

ABOUT THE AUTHOR

...view details