मुंबई - कोरोना विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबईत महापालिकेने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नियम पाळून एकदम चांगला उत्सव साजरा झाला. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांना सांगा अशी प्रतिक्रिया मुंबईचा राजा गणेश गल्ली मंडळाकडून देण्यात आली आहे. गिरगाव चौपाटीवर महापौरांनी गणेश विसर्जनासाठी येणाऱ्यांचे स्वागत करताना ही प्रतिक्रिया दिली.
निर्बंधांमध्ये गणेशोत्सव
मुंबईत गेल्या वर्षी मार्च पासून कोरोनाचा प्रसार आहे. जगभरात कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लागू करण्यात आले. घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन करताना ५ व्यक्ती, सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करताना १० कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली आहे. मंडपात आणि विसर्जनाला येणाऱ्या लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले पाहिजे. मास्क घालावे, गर्दीत जाऊ नये, हात वारंवार धुवा या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिकेने केले.
नियम पाळून उत्सव साजरा
या पार्श्वभूमीवर आज मुंबईमधून दहा दिवसांचे गणेश विसर्जन आज सुरू आहे. या दरम्यान मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्ली गणेशउत्सव मंडळाचा गणपती गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाला पोहचला असता महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याचे स्वागत केले. यावेळी गणेशोत्सव एकदम छान झाला, सर्व नियम पाळून उत्सव साजरा करण्यात आला. महापालिकेनेही चांगले सहकार्य केले, साहेबांना म्हणजेच मुख्यमंत्र्यांना सांगा अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने महापौरांशी बोलताना व्यक्त केली आहे.