मुंबई -गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा विचार करणारे गणेशभक्त अनेकदा दिसतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा माती अथवा शाडूच्या गणेश मूर्ती खरेदी करणाऱ्याकडे कल वाढत आहे. त्यातच पुणे येथील गणेश भक्त रमेश खेर यांनी यंदा तुरटीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. या तुरटीच्या मूर्तीचीच प्रतिष्ठापना ते आपल्या घरी करणार आहेत. तसेच तुरटीच्या मूर्ती सर्वांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी खेर हे आपल्या घरी तुरटीच्या मूर्ती बनवत आहेत.
पुणे येथील गणेश भक्त रमेश खेर यांनी यंदा तुरटीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. दरवर्षी पर्यावरणाला बाधा न आणणाऱ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा पुणे येथील हे गृहस्थ जपत आहेत. रमेश खेर यांनी यंदा पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा विचार केला व त्यांनी चक्क तुरटी पासून गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मूर्तीही बनवल्या.
गुळाचा वापर करून गणेश मूर्ती करावी, असा विचार प्रथम त्यांच्या मनात आला होता. त्यासंदर्भात त्यांनी काही जणांकडे चौकशी केली असता गुळापासून मूर्ती करणे शक्य नसल्याचे उत्तर त्यांना मिळाले. पर्यावरणाशी मैत्री राखणारी कोणत्या प्रकारची मूर्ती करता येईल हा विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तुरटीपासून देखील मूर्ती होऊ शकते व तुरटीची मूर्ती पाण्यात विसर्जन केल्यास पाणी देखील स्वच्छ होते. या कल्पनेची अंमलबजावणी त्यांनी लगेच केली व तुरटीचा खडा घेऊन आपल्या मूर्तीकार मित्राच्या मदतीने त्यांनी तुरटीची एक मूर्ती बनवली. अशा अनेक मूर्ती बनवण्याचा खेर व त्यांचा मूर्तीकार मित्र विवेक कांबळे यांचा मानस आहे. त्यासाठी खेर हे आपल्या व्यावसायिक कामातून वेळ काढत मूर्ती बनवत आहेत.
तुरटी पाण्यात सहज विरघळते तसेच ती जंतुनाशक असल्यामुळे पाण्याचे शुद्धीकरण होते. तुरटीचे हे गुणधर्म लक्षात घेऊन मी व मूर्तीकार कांबळे यांनी ही अभिनव कल्पना सत्यात उतरवली. शाडूच्या मूर्तीपेक्षा तुरटीची मूर्ती बरी म्हणून तुरट्यांची मूर्ती साकारत आहोत. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या विसर्जनानंतर पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचा असेल तर अशा मूर्ती गणेश भक्तांनी घराघरात बसवायला हव्यात हा मानस आहे, असे रमेश खेर यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.