मुंबई - देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक प्रकरणात निवडणूक आयोगाकडून निष्पक्षपणे भूमिका बजावली जात नसल्याचा आक्षेप फ्रेंडस् ऑफ डेमोक्रेसी या संघटनेने घेतला आहे. या अराजकीय संघटनेने आयोगालाच सहा प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत फ्रेंडस् ऑफ डेमोक्रेसीचे विश्वास उटगी यांनी हे सहा प्रश्न उपस्थित केले आहेत.
यावेळी बोलताना उटगी म्हणाले, की निवडणूक आयोग हे निष्पक्षपणे काम करत आहे, असे आम्हाला वाटत नाही. पंतप्रधान नरेंद मोदींनी पुलवामाच्या घटनेत बळी पडलेल्या सैनिकांच्या नावाने मते मागितली. जे जवान बळी पडले त्यांच्याकडे बघून देशातील पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनी आम्हाला मतदान करावे, असे त्यांनी आवाहन केले. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री भारतीय सेनेला मोदी सेना म्हटले असताना त्यांच्यावर आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केलेली नाही असेही उटगी म्हणाले.
मुख्यमंत्री योगींकडून पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अशीच बाब महाराष्ट्रातील एका मंत्र्याने केली, त्यासाठी आयोगाकडे तक्रारी केल्या. त्याचे व्हिडिओही दाखवले. मात्र तरीही आयोगाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. आयोग ही कारवाई करण्यासाठी 23 मेपर्यंत थांबणार आहे काय, असा सवालही त्यांनी केला.
निवडणूक आयोगाकडे तक्रार आल्यानंतर 24 ते 48 तासात त्याचा निकाल लागला पाहिजे. परंतु आयोग या तक्रारीकडे बघणारच नसेल, तर आयोग निष्पक्षपणे काम करत आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले. त्यामुळे आम्हाला याविषयी खेद वाटतो, तरीही आयोगाने निष्पक्षपणे काम करावे. नवीन जे कोणी सत्तेवर येतील त्यांनी बॅलेट बॉक्सची सुविधा करावी. आलेल्या तक्रारींचा 48 तासात निपटारा करावा, अशी मागणीही यावेळी उटगी यांनी केली.
हे आहेत सहा प्रश्न ....
१) भारतीय सैन्याच्या नावाचा वापर मते मागण्यासाठी करू नये, मुख्यमंत्री योगी भारतीय सैन्याला मोदी सैन्य असे संबोधतात त्यांच्यावर कारवाई का होत नाही ?
२) मतदान यंत्रात जे जे घोटाळे होत आहेत, ते सारे भाजपच्या बाजूने कसे होत आहेत, आणि यावर आयोग गप्प का, असाही त्यांनी आरोप केला.
३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम मतदार करणाऱ्या युवकांना आपले मत पुलवामाच्या शहीदांना अर्पण करण्याचे आवाहन केले, त्यावर आयोगाने अद्याप कारवाई केली नाही ?
४) जळगावमध्ये राज्य शासनाचे एक मंत्री पैसे वाटताना व्हिडिओत दिसत आहेत. तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर कारवाई का झाली नाही ?
५) योगी आदित्यनाथांचा पैसे वाटताना व्हिडिओ व्हायरल होऊन तीन आठवडे झाले तरी कारवाई का होत नाही?
६) मतदान यंत्रातील गडबडीत विरोधीपक्ष सातत्याने तक्रार करत असूनही व्हीव्हीपॅट मतमोजणीस आयोगाचा विरोध अनाकलनीय वाटतो. आयोग नुसताच नि:पक्षपाती आहे, असे म्हणण्यापेक्षा तसा तो दिसायला हवा असे आयोगाला का वाटत नाही ?