मुंबई - भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर आणि ए मार्ट या संस्थांच्या सहयोगाने भरवलेले ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे प्रदर्शन पाहण्याची संधी मुंबईकरांना आणि लहानग्यांना मिळणार आहे. हे प्रदर्शन भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर, भवन्स कॉलेज कॅम्पस, अंधेरी येथे ९ जूनपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनात वेगवेगळे मासे, त्यांच्या ४०० पेक्षाही अधिक जाती–प्रजाती, १४० पेक्षा जास्त फिश टँक पाहण्याची संधी मुंबईकर आणि खास करून लहानग्यांना उपलब्ध होणार आहे. तसेच अॅरोवामा, अॅरोप्रियामा, ब्लॅक घोष्ट, डेव्हिल फिश, अॅलिगेटर गार, स्टिंग रे, व्हिमल, मार्स फिश, स्टार फिश, आफ्रिकन खेकडे आणि विविध जातींचे मासे पाहायला मिळणार आहेत.
भवन्स नेचर अॅण्ड अॅडव्हेंचर सेंटर तर्फे जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात. प्राण्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठीही सेंटरतर्फे प्रयत्न केले जातात. घरात मासे कसे पाळावे, खाऱ्या आणि गोड्या पाण्याचे मासे कोणते, घरातल्या माशांची काळजी कशी घ्यावी? याची माहिती व्हावी यासाठी हे प्रदर्शन संस्थेच्या माध्यमातून भरवण्यात आले आहे.
आम्ही वेगवेगळ्या माशांच्या जाती या प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या माध्यमातून निसर्गाला लोकांच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्याद्वारे लोकांमध्ये शोभेच्या माशांची आवड वाढविणे, हासुद्धा एक हेतू आहे. आज निसर्गाबद्दल लोकांमध्ये म्हणावी तशी जनजागृती नाही. अशा आयोजनांमुळे ती वाढीस लागू शकते, असे ए मार्टच्या लुईस फर्नांडिस यांनी सांगितले.
मला मासे पाळण्याची आवड आहे. यामुळे मी येथे आलो आहे. येथे वेगवेगळ्या जातीचे मासे बघण्यास मिळाले. त्याप्रमाणेच मासे कसे पाळावे, याची माहिती ही मिळाली, असे प्रदर्शन बघण्यासाठी आलेल्या प्रियेश पांचाळ यांनी सांगितले.