मुंबई - मुंबईत वारंवार आगी लागण्याच्या घटना घडतात. आगी लागल्यावर अग्निसुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जातो. यासाठी मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित केली जात आहे. लवकरच अग्निसुरक्षाबाबत एकत्रितरित्या सर्व माहिती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून (Mumbai Fire Brigade) देण्यात आल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली (RTI Activist Anil Galgali) यांनी सांगितले.
इमारत तपासणी प्रणाली -
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईत लागणा-या आगी व उपाययोजना बाबत तक्रार केली होती. अग्निसुरक्षा बाबत कोणत्याही प्रकाराची माहिती उपलब्ध केली जात नाही असाही आरोप गलगली यांनी केला होता. अनिल गलगली यांच्या तक्रारीची दखल मुंबई अग्निशमन दलाने गांभीर्याने घेतली आहे. यावर भविष्यात मुंबई शहरातील सर्व इमारतीतील अग्निसुरक्षा संबंधीची माहिती जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध होणाच्या अनुषंगाने मुंबई अग्निशमन दलातर्फे इमारत तपासणी प्रणाली विकसित करण्यात येत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर माहिती एकत्रितरित्या उपलब्ध होणार आहे असे प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी कळविले असल्याचे अनिल गलगली यांनी सांगितले.