मुंबई - खार पश्चिम येथील नूतन वीला या इमारतीला गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागली. या आगीवर रात्री १०.२० च्या दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. या आगीमधून अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन महिलांना बाहेर काढले. त्यापैकी एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर इतर दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घराला आग
भाजपच्या स्थानिक नगरसेविका अलका केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पश्चिम, गुरू गणेश्वर मार्ग, सहावा रोड, प्लॉट क्रमांक २२९, नूतन वीला या आठ मजली इमारतीमधील सातव्या मजल्यावरील एका घरात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही संपूर्ण इमारत जगवानी कुटुंबियांची आहे. या आगीच्या वृत्ताने इमारत व परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे रहिवाशांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारतीबाहेर धाव घेतली. मात्र, या आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.